============================================== कृपया काही सेकंद थांबा load होत आहे ================================================== 
 
सह्याद्री, इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात. 
देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा महाराष्ट्र.  अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि  ते नरसिंह होते "छत्रपती शिवाजी महाराज".   
सह्याद्री आणि त्यातले महाराजांचे गडकोट म्हणजे  आपणा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. कधी काळी या गडकोटावर महाराजांचे पवित्र  अस्तित्व होते आणि त्याचीच साक्ष हे गडकिल्ले साडेतीनशे वर्ष ऊन, वादळ,  पाऊस, मानवी आक्रमण यांना आव्हान देत आजहि उभे आहेत. यातील काही आता  आपल्याच नाकर्तेपणामुळे खंगत चालले आहेत. महाराज फार कमी वर्षे जगले पण  त्यांच्या अफाट कामगिरीमुळे गडकोटांना ते चिरायू करून गेले. ह्या गडांना  महाराजांच्या घामाचे तसेच त्यांच्या जीवाभावाच्या मावळ्यांच्या रक्ताचे  असंख्य अभिषेक झाले आहेत. असे हे पवित्र गड म्हणजे आपल्यासाठी  तीर्थक्षेत्राहून तिळमात्र कमी नाही. महाराजांच्या रायगडाला आयुष्यात एकदा  तरी भेट दिली तरी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने जेवढं पुण्य मिळेल तेवढेच  आत्मिक समाधान तुम्हा आम्हा सारख्या असंख्य शिवभक्तांना लाभते. या अशा  ओजस्वी इतिहासाची झालर असलेल्या गडकोटांची विजयीगाथा भ्रमंती करत स्वतः  अनुभवण्याच्या वसा आपण उचलुया. एकच नम्र विनंती आहे कि अशा गडकोटांना भेटी  देण्यासाठी आपण एक अभ्यासक, चिकित्सक म्हणून जर गेलो तर...... 
...तर तुमचा या गडकोटांकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. कुठल्याही  दुर्गतीर्थाला भेट देण्यापूर्वी त्याची ऐतिहासिक तसेच भौगोलिक पार्श्वभूमी  लक्षात घेतली पाहिजे. याअशा पवित्र स्थळांना भेटी देताना एक पिकनिक,  विरंगुळा किंवा नुसताच धांगडधिंगा, गडांचे दगड उकरून काढणे अथवा खडू, चुना,  किंवा तैल रंग वापरून गडांच्या भिंती खराब करण्याच्या उद्देशाने न जाता  आपण एका पवित्र स्थळाला भेट देत आहोत याची जाण राखली पाहिजे. तसेच या  गडकोटांच्या आयुष्यावृधीसाठी जे दुर्गविज्ञान, दुर्ग स्थापत्य महाराजांनी  वापरले आहे त्या दृष्टीकोनातून ज्ञानार्जन करण्याच्या उद्देशाने जर तुम्ही  गेलात तर तुम्हाला असे गडकोट बघण्यात जिवंतपणा वाटेल अशी माझी खात्री आहे.  शिवाय ज्यांनी हे दुर्गवैभव उभारले त्यांना कधी स्वतःचे नाव कोरावेसे वाटले  नाही तेथे स्वतःची नावे लिहिण्याइतके खचितच आपण मोठे नाहीत, हि जाण  सर्वांनी ठेवली पाहिजे.  
मित्रांनो हे गडकोट आपल्याला मनापासून साद घालत आहेत....चला तर काही गडकोट माझ्या नजरेतुन पाहुया. 
 ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १ – किल्ले शिवनेरी 
================================================== 
"आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला" अशी स्थिती स्वराज्यात सर्वत्र  असताना, किल्ले शिवनेरीवर एक वादळ जन्माला आले. हे वादळ होते उग्र विजांचे,  हे वादळ होते स्वातंत्र्याचे, हे वादळ होते स्वाभिमानाचे आणि या वादळाचे  नाव होते "शिवाजी", त्या वादळाला जन्म देणारी थोर माता होती "जिजाऊ". "हि शांत निजे बारा मावळे थेट, शिवनेरी, जुन्नर पेठ 
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली, कोकणच्या चवदा ताली 
ये भिववाया बागुल तो बघ बाळा, किती बाई काळा काळा 
इकडे हे सिद्दी जवान, तो तिकडे अफझुलखान, पलिकडे मुलुख मैदान 
हे आले रे तुजला बाळ धराया 
नीज रे नीज शिवराया 
गुणी बाळ असा जागसि का रे वाया...." अंगाई कोणतीही आई आपल्या मुलांसाठी गाते, परंतु आपल्या बछ्ड्याला स्वराज्याच्या शत्रुंबद्दल अंगाईतुन सांगणारी ती वाघिण एकच "जिजाऊ". हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय जेथे झाला तो हा किल्ले "शिवनेरी".![]()  ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प २ – किल्ले रायगड 
================================================== 
रायगड - पूर्वी जिथे गडावर चढण्या-उतरण्याचे धाडस फक्त वारा आणि पाणी करू शकतात असा हा बेलाग किल्ला आणि स्वराज्याची राजधानी. या गडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणजे "शिवराज्याभिषेक". महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. 
"किल्ले  रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळाळु लागले, भारतवर्षातील,  इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, कर्नावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच  भंगलेल्या सार्वभौम सिंहासनाच्या जखमा रायगडावर बुजल्या. हि भूमी  राजश्रीराजविराजीतसकलसौभाग्य संपन्न झाली. 
"हे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा." महाराजांच्या राज्याभिषेकाला देशातील सात नद्यांचे पाणी कलशातुन आणले. 
"गंगा, सिंधू, यमुना, गोदा कलशातुन आल्या, 
शिवरायांना स्नान घालुनी, धन्य धन्य झाल्या, 
धीमी पाऊले टाकित येता, रुद्राचा अवतार 
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जय जयकार..... 
"प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस 
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज 
शिवछ्त्रपती महाराज" शिवछ्त्रपतींचा जय हो . . . 
श्री जगदंबेचा जय हो . . . 
या भरतभूमीचा जय हो . . . 
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला 
दहादिशांच्या हृदयामधुनी अरूणोदय झाला. अशी हि शिवभक्तांची पंढरी. "पूर्वेकडील  जिब्राल्टर" अशी ज्याची पूर्वी ओळख होती तो दूर्गदुर्गेश्वर "रायगड".  स्वराज्याची राजधानी. रायगडाचे घेरा इतका मोठा आहे कि संपूर्ण गड  फिरण्यास/जाणुन घेण्यास दोन दिवसही अपुरे आहे. 
![]()  या गडाने अनुभवलेला अत्यंत दु:खद प्रसंग म्हणजे  महाराजांचे निधन. बखर म्हणते, "ते दिवस पृथ्वीकंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह  होऊन गेल्या. श्रीशंभूमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले." आजही  शिवसमाधीचे दर्शन घेताना त्यांच्या या महान कार्याचा इतिहास डोळ्यासमोर  आल्यावाचुन राहत नाही. 
![]()  ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ३ – अजिंक्यतारा 
================================================== 
सातार्याचा अजिंक्यतारा हि मराठ्यांची चौथी राजधानी. महाराजांच्या  मृत्युनंतर औरंगजेबाने वेढा घातला आणि किल्ला जिंकल्यावर त्याचे नामकरण  "आझमतारा" असे केले. ताराराणीच्या सैन्याने तो पुन्हा जिंकुन त्याचे नामकरण  "अजिंक्यतारा" केले. आज गडावर मंगळादेवीचे मंदिर, ताराराणीचा ढासळलेला  राजवाडा आहे. ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ४ – सज्जनगड 
================================================== 
समर्थ रामदासस्वामींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेला हा किल्ला  पायथ्याशी असलेल्या परळी गावामुळे हा परळीचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो.  शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडुन हा किल्ला जिंकुन त्याचे नामकरण सज्जनगड  केले. महाराजांनीच समर्थांना येथे वास्तव्य करण्याची विनंती केली आणि समर्थ  येथे कायमचे वास्तव्यास आले. गडावर श्रीराम मंदिर, समर्थांचा मठ, शेजघर,  समर्थांनी वापरलेल्या वस्तु सारे काहि पाहण्यासारखे आहे. 
![]()  ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ५ – किल्ले लोहगड 
================================================== 
नावाप्रमाणेच मजबूत आणि बुलंद असा किल्ला. १६५७ मध्ये कल्याण-भिवंडी परिसर  शिवाजी महाराजांनी जिंकुन घेतल्यावर लोहगड स्वराज्यात सामील करून घेतला.  १६६५ मध्ये पुरंदराच्या तहात लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि १६७० मध्ये  मर्द मावळ्यांनी तो परत स्वराज्यात परत आणला. गडावरचे बांधकाम बर्यापैकी  सुस्थितीत आहे. गडावरच एक डोंगराची सोंड दिसते, तोच लोहगडावरचा प्रसिद्ध  "विंचुकाटा".  ![]() ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ६ – किल्ले कर्नाळा 
================================================== 
पुरंदराच्या तहामध्ये मुघलांना देण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये कर्नाळा  किल्याचा सामावेश होता. पुढे १६७० मध्ये मावळ्यांनी छापा घालुन परत  स्वराज्यात आणलेला हा किल्ला पनवेल पासुन अगदी जवळ आहे. या किल्ल्याचे  मुख्य आकर्षण आहे तो माथ्यावरचा सुळका. प्रस्तरारोहणांसाठी आव्हान ठरलेल्या  या सुळक्यावर बर्याच जणांनी निशान फडकवले आहेत. सध्या मधमाशा आणि दुर्मिळ  पक्ष्यांची घरटी/पक्षी यांमुळे प्रस्तरारोहणावर बंदी घालण्यात आली आहे. ![]() ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ७ – गोरखगड 
================================================== 
शहाजीराजांच्या काळात या गडाला महत्व होते. मात्र कोणत्याहि लढाईचा उल्लेख  इतिहासात नाही. शिवकालात या गडाचा उपयोग आसपासच्या प्रदेशवर नजर  ठेवण्यासाठी होत असे. नाणेघाट मार्गे जुन्नर्ला जाताना या गडाचा उपयोग  निवास्थान म्हणुन होत असे. गोरक्षनाथांच्या साधनेचे स्थान म्हणुनच या गडाचे  नाव "गोरखगड" ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ८ – मच्छिंद्रगड 
================================================== ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ९ – कोराईगड (कोरीगड) 
================================================== 
१६५७ मध्ये महाराजांनी कोराईगड लोहगड,विसापुर, तुंग-तिकोना या  किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला, या व्यतिरीक्त इतिहासात याचा  फारसा उल्लेख नाही. गडावरच्या कोराईदेवीवरूनच याचे नाव कोराईगड पडले असावे.  गडावर आजही सहा तोफा सुस्थित आढळतात. त्यातील सर्वात मोठ्या तोफेचे नाव  "लक्ष्मी".  
![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १० – नाणेघाट 
================================================== 
सातवाहन काळात जुन्नर ते कल्याण या राजमार्गावर डोंगर फोडुन केलेला हा  व्यापारी मार्ग (आजच्या भाषेत एक्स्प्रेस वे). प्राचीन काळी या मार्गावरून  व्यापारी लोक आपला माल, घोड्यावरून, बैलगाडीवरून नेत असे. या  व्यापार्यांकडुन जकात जमा करण्यासाठी एक रांजण ठेवलेला असे. जो  संध्याकाळपर्यंत नाण्यांनी पूर्ण भरलेला असत. आजही तो रांजण आपल्याला  नाणेघाटात बघायला मिळतो. नाणेघाटाच्या याच नळीच्या मुखाजवळ कातळात कोरलेली  एक गुहा आहे. या गुहेत सातवाहन काळातील काहि लेख आढळतात. ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प ११ – सरसगड 
================================================== 
पुणेरी पगडीच्या आकाराच्या या किल्याला "पगडीचा किल्ला" म्हणुनही ओळखले  जाते. अष्टविनायकांपैकी पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे उभा असलेला  हा सरसगडाचा उपयोग टेहळणीकरीता होत असे. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या  डागडुजीसाठी २००० होन मंजुर केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत गडाची  व्यवस्था भोर संस्थानाकडे होती. 
![]()  ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १२ – किल्ले पन्हाळा 
================================================== 
अफझलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसात शिवाजी महाराजांनी पन्हाळा गड  जिंकला. १६६० मध्ये सिद्दि जौहरचा वेढा किल्ल्यास पडला असता महाराजांचे  पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे रवाना होण्याचा इतिहास सर्वश्रुत आहेत.  बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेला हा किल्ले पन्हाळा 
![]()  ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १३ – कोथळीगड (पेठचा किल्ला) 
================================================== 
पायथ्याशी असलेल्या पेठ या गावामुळे हा पेठचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो.  हा बलाढ्य दूर्ग नाहि पण एक बेलाग सुळक्यावरचा संरक्षक ठाणं आहे.  मराठ्यांचे हे शस्त्रागार होते. या किल्ल्याला रक्तरंजित इतिहास लाभला आहे.  या किल्ल्याचे वैशिष्ट्यं म्हणजे सुळक्याच्या पोटात खोदलेल्या पायर्या  ज्या थेट कुतुबमिनाराची आठवण करून देतात. 
![]()  ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १४ – रत्नदुर्ग 
================================================== 
तीनही बाजुंनी वेढलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. शिवाजी  महाराजांनी अदिलशहाकडुन हा किल्ला जिंकुन स्वराज्यात आणला. गडावर भगवती  देवीचे सुंदर मंदिर आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे मनोरम दर्शन  घडते. ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १५ – शिरगावचा किल्ला 
==================================================च 
१७३९ साली हा किल्ला मराठ्यांनी डहाणु, केळवे, तारापुर या किल्यांबरोबर  जिंकुन घेतला. आधी या किल्याचा ताबा पोर्तुगिजांकडे होता. नंतर इतर  किल्ल्याप्रमाणेच हाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. शिरगावचा किल्ला साधारण  २०० फूट लांब व १५० फूट रुंद आकाराचा आहे. किल्ल्याला चार कोपर्यात चार  बुरुज असुन प्रवेशद्वार हे एका बुरुजाच्या बाजुलाच आहे. प्रवेशद्वाराच्या  वर एक षटकोनी आकाराचा अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. येथील तटबंदी,  बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणार्या तटबंदीच्या बाहेरून  पायर्या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातुनही पायर्या  केलेल्या आहेत. आतुन जाणार्या पायर्या सध्या वापरात नाही. ठाणे जिल्ह्यात  अर्नाळ्याच्या तोलामोलाचा आणि उत्तम स्थापत्यकला दाखविणारा असा हा किल्ला  आहे. किल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणार्या समुद्रकिनार्याचे सुंदर  दृष्य दिसते. संपूर्ण किल्ला हा तासाभरात व्यवस्थित पाहुन होतो. 
![]()  ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १६ – वितंडगड (तिकोना किल्ला) 
================================================== 
या किल्ल्याबद्दलही फारसा इतिहास उपलब्ध नाही. महाराजांनी हाहि किल्ला १६५७  मध्ये स्वराज्यात सामिल करून घेतला. संपूर्ण पवनामाळेवर देखरेख  ठेवण्यासाठी या किल्याचा उपयोग होत असे.गडाचा माथा जास्त मोठा नसल्याने एका  तासात संपूर्ण किल्ला पाहुन होतो. बरेचसे ट्रेकर्स तुंग-तिकोना हि जोडगोळी  एका दिवसात करतात. ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १७ – अजिंक्य जंजिरा 
================================================== 
भर समुद्रात लाटांचा असंख्य मारा सहन करत असलेला अभेद्य, अजिंक्य असा हा  जंजिरा. सिद्धीनवाबांचा हा किल्ला. जंजिरा हातात आल्याशिवाय तळकोकणात  वर्चस्व गाजवता येणार नाहि हे जाणुन शिवरायांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न  केला, पण त्यांना यश आले नाही. शिवरायांना जिंकता न आलेला हा एकमेव किल्ला.  आज किल्ला भग्नावस्थेत आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्ये असे कि किल्ल्याच्या  अगदी जवळ पोहचेपर्यंत याच्या मुख्यद्वाराचे दर्शन होत नाहि. ![]() ![]() ![]() ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १८ – किल्ले पुरंदर 
================================================== 
मुरारबाजींचा पराक्रमाने पावन झालेला हा किल्ले पुरंदर. १६५७ साली  संभाजीराजांचा जन्म पुरंदरावर झाला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी  आदिलशहाने फत्तेखानास पाठवले. गडावर मुरारबाजी होते. तेथे धुवांधार युध्द  झाले. खानाने वज्रगड घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला. मुरारबाजी आणि खानात  घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याबरोबर पुरंदरही पडला. पुढे १६६५  साली इतिहास प्रसिद्ध "पुरंदरचा तह" झाला आणि २३ किल्ले मुघलांना द्यावे  लागले. ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प १९ – वज्रगड 
================================================== 
पुरंदर आणि वज्रगड हे एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी दोन स्वतंत्र  किल्ले आहेत. पुरंदरच्या भैरवखिंडीतुन वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प २० – किल्ले सिंहगड 
================================================== 
"आधी लगीन कोंडाण्याचे" अशी गर्जना करणारे नरवीर तानाजी यांच्या अचाट  पराक्रमामुळे हा किल्ला इतिहासप्रसिद्ध झाला आहे. उदेभान राठोड हा  त्यावेळेस कोंडाण्याचा सरदार होता. कोंडाणा जिंकण्याच्या इर्ष्येने तानाजी  आणि उदेभान यांच्यात घनघोर युद्ध झाले. तानाजींची डाव्या हातातील ढाल  तुटली. त्यांनी डाव्या हाताची ढाल करून उदेभानला लढा दिला. या लढाईत दोघे  ठार झाले. शिवाजी महाराजांना तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेंव्हा ते  म्हणाले, "गड आला, पण माझा सिंह गेला". तेंव्हापासुन कोंडाणा किल्ला सिंहगड  म्हणुन प्रसिद्ध पावला. 
![]()  ![]() ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प २१ – हरिश्चंद्रगड 
================================================== 
ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखला जाणारा हा गड. हरिश्चंद्रगडाची वारी न  केलेला ट्रेकर्स विरळाच. इतर सगळ्या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी  आहे तर हरिश्चंद्रगडाला पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. याचा उल्लेख  अग्नीपुराण आणि मत्स्यपुराणात आढळतो. हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण  म्हणजे कोकणकडा. पावसाळ्यात याचे सौंदर्य शब्दातीत असते. ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प २२ – तोरणा 
================================================== 
शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात तोरणा किल्ला जिंकुन "स्वराज्याचे  तोरण" उभारले. गडाची पहाणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव  "प्रचंडगड" असे ठेवण्यात आले.राजांनी आग्र्याहुन आल्यावर या गडाचा ५ हजार  होन खर्च करून जीर्णोध्दार केला. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला मराठ्यांचा  हा एकमेव किल्ला होय. 
![]()  ================================================== 
================================================== 
दुर्गपुष्प २३ – नारायणगड 
================================================== 
![]()  ==================================================  
ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी  
ना मोठेपणासाठी ना स्वार्थसाठी 
जीव फक्त तडफ्तो मराठी अस्मितेसाठी  
जय महाराष्ट्र जय भवानी ! ----- छत्रपती शिवाजीराजे भोसले
  
--  
खुभी नाही माझ्यात एवढी  कि..! 
कुणाच्या  हृदयात ठाण  मांडून  जाईल..! 
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल..!असे  क्षण जे देऊन जाईल.......! 
 
धन्यवाद..  
  |